Pages - Menu

Thursday, June 18, 2020

सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार व्यायामाचा एक प्रकार


व्यायामाचा आणि उपासनेचा एक प्रकार. याने माणसाच्या सर्व इंद्रियांना व्यायाम मिळून सर्वत्र रक्ताचा पुरवठा होतो. आकुंचन-प्रसरणाच्या क्रिया सलग व सुलभ होत असल्याने हा व्यायामाचा शास्त्रोक्त प्रकार मानतात. प्राचीन काळापासून ते आजतागाय त उपासनेचा व व्यायामाचा हा प्रकार परंपरेने चालत आला आहे. त्यामागे अनेक धार्मिक समजुती व श्रद्घा आहेत.

सूर्यामुळे सृष्टीला उत्साह, उष्णता, आनंद आणि जीवन मिळत असल्यामुळे प्राचीन काळापासून हिंदू धर्मीय सूर्याला एक देवता मानतात. चलाचल सृष्टीचा सूर्य हा आत्मा आहे, असे वेदवचन आहे. भारतात धर्म आणि आरोग्य यांची सांगड घालण्याची प्रथा प्राचीन काळापासून आढळते. त्यामुळे सूर्यनमस्कार हा एक उपासनेचा मार्ग बनलेला असावा. भारतात या आरोग्यदायक उपासनेला शास्त्रीय स्वरुप देण्याचे प्रयत्न झाले. त्यातून अनेक स्तोत्रे, संकल्प आणि पद्घती तयार झाल्या. भारतात अनेक ठिकाणी सूर्योदयाच्या पूर्वी सूर्योपासनेकरिता नित्यनेमाने नमस्कार घालणे, हे एक धार्मिक कर्तव्य मानले जाते. याला ‘अष्टांग’ वा ‘साष्टांग’ नमस्कार किंवा ‘अष्टांग दंड’ असेही म्हणतात. आबालवृद्घ, स्त्री-पुरुषांना उपयुक्त व फलदायी असा हा व्यायाम व उपासनाप्रकार आहे.

सूर्यनमस्कारासाठी स्वच्छ, शांत व हवेशीर जागा योग्य असते. त्यासाठी सु. २–३ मी. लांब आणि सु. पाऊण ते एक मीटर रुंद जागा पुरेशी असते. अंगावर सैल व हलकी वस्त्रे घालून व जमिनीवर सतरंजी वा चटई पसरुन नमस्कार घातले जातात. सतरंजी वा चटई न वापरता नुसत्या जमिनीवरही सूर्यनमस्कार घालता येतात; मात्र ती जमीन फार गुळगुळीत नसावी, जेणेकरुन त्यावरुन हातपाय घसरु नयेत. थंड पाण्याने स्नान करुन नमस्कार घालताना सूर्याचे कोवळे किरण अंगावर पडले, तर त्याचा चांगला उपयोग होतो. कोणत्याही साधनावाचून थोड्या जागेत व थोड्या वेळात पुरेसा व्यायाम मिळतो, हे सूर्यनमस्कारांचे एक वैशिष्ट्य होय.

No comments:

Post a Comment