Pages - Menu

Tuesday, June 16, 2020

गोळाफेक -


लहान-लहान मुले दगड, गोटे लांब फेकण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातूनच सुरू झालेला खेळ म्हणजे गोळाफेक.

मानवी शरीराला विविध गुण, कौशल्य व कला यांची जन्मजात देणगी मिळालेली आहे. त्यासाठी त्यांच्यात असलेल्या सुप्तगुणांना जागृत करणे खूप गरजेचे आहे. या गुणांपैकी असलेला एक गुण म्हणजे फेकणे. आपण विविध गोष्टी इकडे तिकडे फेकत किंवा भिरकावत असतो. त्यातूनच जन्माला आलेले खेळ म्हणजे गोळाफेक, थाळीफेक, हातोडाफेक, भालाफेक. आयर्लंडमध्ये सुरूवातीला गंमत म्हणून गोल आकाराचे दगड लांब फेकण्याचा खेळ लोक खेळत असत. पण नंतर नंतर हा प्रकार खेळ म्हणून पुढे आला.

त्यानंतर तो दगड किती आकाराचा, वजनाचा असावा, जयपराजयाचे निकष काय असावेत? याचा सारासार विचार होऊन हा खेळ सुरू झाला. आयर्लंडमध्ये सुरू झालेला हा खेळ नंतर स्कॉटलंडमध्ये प्रचलित झाला व त्यावेळी आयर्लंडमध्ये व स्कॉटलंडमध्ये या खेळाचे सामने सुरू झाले. त्यानंतर अमेरिकेतसुद्धा हा खेळ पोहचला व तो तिथे प्रचंड लोकप्रियसुद्धा झाला. त्यानंतर आयर्लंडमध्ये जन्म झालेल्या गोळाफेक या खेळात कालांतराने सुधारणा होऊन त्याची नियमावली तयार केली गेली. गोळा कोणत्या धातूचा असावा, किती वजनाचा असावा, किती खेळाडू स्पर्धेत भाग घेऊ शकतात याबाबत नियमावली तयार करण्यात आली व हा खेळ प्रसिद्ध होऊ लागला. गोळाफेक या खेळामुळे शारीरिक ताकत वाढते.

या खेळात वापरला जाणारा गोळा हा लोखंडी किंवा पितळी धातूचा असतो तर त्यात शिशासारखा वजनदार धातू भरलेला असतो. पुरुष खेळाडूंसाठी १६ पौंड (७.२५७ कि. ग्रॅ.) वजनाचा गोळा वापरला जातो तर महिला खेळाडूंसाठी हाच गोळा ८ पौंड १३ औंस (४कि. ग्रॅ.) वजनाचा गोळा वापरला जातो. तर शालेय स्पर्धांमध्ये मुलांसाठी हाच गोळा १२ पौंड (५.४४३ कि. ग्रॅ.) वजनाचा वापरला जातो. पुरुष व महिलांसाठी वेगवेगळी स्पर्धा आयोजित केली जाते. ७ फूट(२.१३५ मी.) व्यासाच्या वर्तुळातून गोळाफेक करायची असते.  या वर्तुळमध्यातून ४० अंशांचा कोन असतो. या कोनातच गोळा फेकायचा असतो. स्पर्धकाने एकदा गोळा घेऊन वर्तुळात प्रवेश केला की तो वर्तुळातून बाहेर जाता कामा नये. जर तो वर्तुळाबाहेर गेला तर तो फाऊल (नियमभंग) होतो. एकदा गोळा फेकल्यावर व जमिनीवर पडल्यावर स्पर्धकाने वर्तुळाच्या मागील भागातूनच बाहेर पडले पाहिजे. भाग घेणाऱया खेळाडूंपैकी ज्या खेळाडूचा गोळा सर्वात लांब जाईल तो खेळाडू किंवा स्पर्धक विजेता होतो.

वर्तुळातून गोळा हा विशिष्ट कोनातूनच फेकावा लागतो. त्यात गोळ्याची पकड, पायांच्या विशिष्ट हालचाली व गोळाफेक व पायांची अदलाबदल असे तीन टप्पे गोळाफेकीत असतात. पायांच्या हालचालीतही दोन प्रकार असतात. एक घसरण्याची व दुसरी लंगडण्याची क्रिया. त्यावेळी गोळा हा विशिष्ट पद्धतीने हातात धरून गळपट्टीच्या हाडाजवळून फेकावा लागतो. या खेळात एकावेळी ८ किंवा त्यापेक्षा जास्त खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले असल्यास प्रत्येक खेळाडूस तीन संधी देऊन अंतिम आठ खेळाडू निवडले जातात व त्या आठ जणांना पुन्हा तीन संधी देऊन सर्वोत्कृष्ट लांब गोळा फेकणाऱया खेळाडूला विजेता घोषित केले जाते. गोळाफेक हा अतिशय सुंदर असून तो खेळ जगभर खेळला जात असला व आपली लोकसंख्या १२५ करोडपेक्षा जास्त असली तरी या खेळात आपला देश खूपच मागे आहे.

No comments:

Post a Comment